
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेल्या सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ही कंपनी देशातले नवे मॉडेल आहे.
सह्याद्री फार्म्स हे मोहाडी च्या एका डोंगरावर उभं असलेलं एक भन्नाट साम्राज्य. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली आणि शेतकऱ्यांमार्फत चालवली जाणारी कंपनी म्हणजे सह्याद्री फार्मर्स! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आराखडा नजरेसमोर ठेवून उभी ठाकलेली, आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटायला भाग पाडणारी सह्याद्री फार्म्स!
सह्याद्री फार्म ची स्थापना नाशिक मधील एका तरुणाने म्हणजेच श्री. विलास शिंदे यांनी २०११ साली केली. आजच्या सह्याद्री फार्मचे ते चेअरमन आणि सर्वेसर्वा आहेत.
सह्याद्री फार्म्सचे स्वतःचे पॅक हाऊस, जॅम, ज्यूस केचअप युनिट, IQF युनिट,लॅब, ट्रेनिंग सेंटर आहे द्राक्षाच्या वेगवेगळ्या जाती तसेच संत्रा, पेरू, अंजीर,लिंबू,डाळिंब यांच्याही वेगवेगळ्या जाती त्यांनी तयार केल्या आहेत.
शेतीमध्ये पदव्युत्तर उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एखाद्या उच्च नोकरीची वाट न पकडता स्वतःचं काहीतरी उभं करणं, आपण ज्या मातीत जन्म घेतला आहे त्या मातीतल्या लोकांना समृद्ध काढण्यासाठी त्यांचं असं काही निर्माण करणं हे स्वप्न घेऊन खरतर १९९५ पासून एका प्रवासाला सुरुवात झाली.
द्राक्ष पिकातील त्यांची सुरवातीची वाटचाल देखील खूप आव्हानात्मक गेली. काही विश्वासू शेतकऱ्यांच्या सोबत त्यांनी एक्स्पोर्टसाठी काम सुरू केलं. 2003-2004 च्या दरम्यान पहिला कंटेनर नेदरलँडला पाठवला. 20-25 दिवसांनी कंटेनर तिथं पोहचल्यानंतर अण्णांना मेल आला की क्वालिटी योग्य नसल्याने आपला माल रिजेक्ट करत आहोत. मालाच्या गुणवत्तेबाबत त्यांना खात्री असल्यामुळं त्यांनी नेदरलँड गाठायचं ठरवलं. सकाळी 4 वाजता नाशिक मधून ट्रक पकडून मुंबईत जाऊन एम्बसी मधून व्हिजा मिळवला. संध्याकाळीच विमान पकडून नेदरलँड ला रवाना झाले. तिथं गेल्यावर, मार्केटचा अभ्यास केल्यावर त्यांना समजलं की माल हा गुणवत्ता खराब आहे म्हणून रिजेक्ट केलेला नसून त्यावेळी संपूर्ण मार्केट कोसळलं होतं आणि त्याची झळ यांना बसली होती. हे नुकसान पचावण्याशिवाय त्यांच्या शेतकरी ग्रुपकडे काहीही पर्याय नव्हता.
पुढील वर्षी परत प्रयत्न करून द्राक्ष निर्यात केली आणि यावेळेस मात्र यश मिळालं इतका अपयश पचवून मिळालेले हे यश सर्व शेतकऱ्यांनी सेलिब्रेट केलं.
इथून पुढे खरा प्रवास चालू झाला 2009 साली युरोपियन युनियनने लिओसीन या घटकाची रेसिड्यु मर्यादा अचानक कमी केली परंतु याबाबत भारतीय मार्केटमध्ये काहीही बातमी आली नाही आणि 2009 साली पाठवलेले त्यांचे बरेच कंटेनर या कारणाने रिजेक्ट झाले. याआधी लिओसीन हे द्राक्ष पिकात वापरलं जायचं परंतु बदल झालेला माहित नसल्याने परत मोठं संकट उभा राहिलं. शेतकऱ्याचं भलं मोठं आर्थिक नुकसान झालं. याच काळात अण्णांनी स्वतःची जमीन विकून शेतकऱ्यांचे पैसे चुकते केले परंतु संकटापुढे हात टेकले नाहीत.
शेतकऱ्यांनी संघटित होऊन संकटावर मात केली पाहिजे असे विलास अण्णांचे मत होते त्यामुळे हा सर्व द्राक्ष उत्पादक एका छताखाली एकत्र करून त्यांना द्राक्ष निर्यातीसाठी तयार करणे हे चॅलेंज त्यांनी स्वीकारले आणि 2011 साली सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली आणि इथून पुढे चालू झालेली घोडदौड आपणा सर्वांना माहीत असेलच. दर वर्षी कंटेनर ची संख्या वाढत गेली. आज कंपनीचे 18000 रजिस्टर शेतकरी आहेत आणि 42 देशात आज द्राक्ष एक्स्पोर्ट होत आहेत.
१९९५ ते २०१० या वर्षांमध्ये विलास अण्णा यांनी अनेक अपयशं पाहिली. आपण कित्येक साम्राज्याची सुरुवात शून्यातून होताना पाहिली आहे परंतु सह्याद्री फार्म्सची सुरुवात साडे सहा कोटींच्या कर्जातून झाली आहे.
सुरुवातीला मका आणि टरबुजाच्या शेतीचा प्रयोग केला, तो काही कारणांनी फसला. त्यामागोमाग स्वतःचं डेरी फार्म सुरू केलं पण त्यामध्येही यश आलं नाही. इथवर डोक्यावर ७५ लाखापर्यंत कर्ज झालं. तरीही न डगमगता निर्यातीचा व्यापार सुरू केला. द्राक्षांच्या निर्यातीवर विशेष भर देण्यात आला. यात थोडा जम बसतोय असे वाटत असताना, युरोपात पाठवलेल्या काही कंटेनरचे पैसे तेथील व्यापाऱ्यांनी बुडवल्यामुळे प्रचंड नुकसान झालं आणि पुढे युरोपात भारतीय द्राक्षांवर आयातीच्या आलेल्या निर्बंधांमुळे नुकसान होऊन कर्ज साडेसहा कोटी पर्यंत जाऊन पोहोचले. आता या परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांनी उद्योग करण्याचा विचार सोडून दिला असता आणि काही जणांच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा आले असते. पण इथे न डगमगता विलास अण्णा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ६२३ शेतकऱ्यांना घेऊन सह्याद्री फार्मची स्थापना केली आणि या सह्याद्रीने येत्या दहा वर्षात या क्षेत्रामध्ये आपला जबरदस्त ठसा उमटवला आहे.
आज कंपनीचे 18000 रजिस्टर शेतकरी आहेत आणि 42 देशात आज द्राक्ष एक्स्पोर्ट होत आहेत.
आज प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे ६,००० कामगार सह्याद्रीसाठी काम करत आहेत. ४२ देशांमध्ये सह्याद्री निर्यात करते आहे आणि तिची २०२०-२१ची वार्षिक उलाढाल सुमारे ५२५ कोटी वर पोहचली आहे.
या महाराष्ट्रात इतरही अनेक खेडी आहेत जिथे छोट्या जमिनी असलेले शेतकरी आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ते सह्याद्रीशी कसे जोडले जाऊ शकतात? असे विचारले असता ते म्हणाले. सध्या सह्याद्रीचा व्याप फार मोठा आहे. इथल्या शेतकाऱ्यांसाठीच आम्ही अपुरे पडतो आहोत. या महाराष्ट्राला अशा एक नाही तर अनेक सह्याद्रींची गरज आहे. माझ्या खांद्यावर आधीच खूप भार आहे. त्यात आणखी कुणाला खांद्यावर घेऊन मी तो भार वाढवू इच्छित नाही. परंतु हात देऊन नक्कीच मदत करू शकतो. सह्याद्रीने आपल्या अनुभवाच्या आधारे अनेक फार्मर प्रोड्यूसर कंपनी तयार व्हाव्यात यासाठी, त्यांना प्रशिक्षण द्यावे या हेतूने टाटा स्ट्राईव्हशी हात मिळवून सह्याद्रीमध्ये प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. त्यामधून सह्याद्री सारख्या अनेक कंपनी घडतील आणि आपापल्या विभागांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी काम करू शकतील. त्यांना समृद्ध करू शकतील. अशा पद्धतीने जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या एकजूट झाल्यामुळे आणि सुयोग्य यंत्रणेचा वापर केल्यामुळे दूर होऊ शकतील.
“कुणाला खांद्यावर घेऊन स्वतःचा भार वाढवू नका. त्यांना उभे राहण्यास मदत करण्यासाठी हात द्या.” वा! किती मोठा धडा होता हा!
जो आनंद आणि प्रेरणा रायगडावर गेल्यावर मिळते त्याच्याच काही अंशी प्रेरणा सह्याद्रीमध्ये गेल्यावर अनुभवता येते.
कोणत्याही सरकारी योजनांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना स्वाभिमानाने, ताठ मानेने उभं रहायला शिकवणारी, शेतकऱ्यांच्या मेहनतीचं चीज करून देणारी, अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली, ७९८८ नोंदणी केलेले शेतकरी भागदारक असलेली, २३,९९० एकर जमिनीवर लागवड करणारी, १२० गावांमध्ये कार्यरत असणारी, जगभरात ३३,०३६ हुन अधिक ग्राहकांना सेवा पुरवणारी, १६०० टन द्राक्षे तसेच ५५५१३ मॅट्रिक टन टोमॅटो दर वर्षी निर्यात करून या निर्यातीत अग्रेसर असलेली आणि ४२ देशांशी व्यापार करणारी सह्याद्री फार्म्स मराठी माणसासाठीच नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी अभिमानास्पद आहे…